जालना - शहरात असलेल्या सामान्य रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात केल्यानंतर आता आरोग्य विभागाने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. त्यानुसार महत्त्वाच्या आणि मध्य वस्तीच्या ठिकाणी असलेल्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागातील खाटांची संख्या वाढविली आहे.
राजुरा ग्रामीण रुग्णालयाची निवड
भोकरदन, जाफराबाद आणि बदनापूर तालुक्याला सोयीस्कर आणि मध्यवर्ती ठिकाणी आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर उपलब्ध होईल, अशा पद्धतीने राजूर येथील ग्रामीण रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे.
कोरोना रुग्णालयांमध्ये 80 खाटांची व्यवस्था केलेली आहे. त्यापैकी 70 खाटांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जाणार आहे. तर दहा खाटा अतिदक्षतासाठी राखीव ठेवलेले आहेत. याचप्रमाणे मंठा येथील रुग्णालयात 35 पैकी 25, घनसावंगी 5, अंबड 5, अशाप्रकारे अतिदक्षताची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्यातरी यामध्ये भरती असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरमार्फतच प्राणवायुचा पुरवठा केला जाणार आहे. राजूर येथील काम प्रगतिपथावर असून या महिन्याच्या शेवटी हे रुग्णालय सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जिल्हाधिकार्यांनी केली पाहणी
जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अर्चना भोसले यांच्यासह जिल्ह्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच राजूर येथील कोविड रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.