जालना - गेल्या 20 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असलेले जिल्हा क्रीडा संकुल आजही "असून अडचण नसून खोळंबा" ठरले आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातून क्रीडा क्षेत्रात भरारी घेणाऱ्या खेळाडूंची मात्र कुचंबना होत आहे.
क्रीडा संकुलाचे साहित्य इतर ठिकाणी -
जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या अधिकारात येत असलेले हे जिल्हा क्रीडा संकुल सुमारे 42 लक्ष रुपयांचे खेळाचे साहित्य खरेदी करण्यात आले होते. मात्र त्याचा वापर या क्रीडासंकुलात न होता इतर संस्थांना ते वापरण्यासाठी दिले होते. त्यामुळे क्रीडा संकुल नेमके आहे कोणासाठी ? हाच प्रश्न उपस्थित केला जात होता. 31 ऑगस्ट 2018 रोजी झालेल्या जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी देखील या विषयी नाराजी व्यक्त करत हे सर्व साहित्य जिल्हा क्रीडा संकुलामध्येच ठेवले पाहिजे, अशा सूचना दिल्या होत्या. तसेच या क्रीडा संकुलाच्या व्यायाम शाळेत अत्याधुनिक साहित्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी लागणारा निधी व्यायाम शाळा विकास अनुदान योजनेतून मंजूर करून नवीन साहित्य खरेदी करावे आणि जुन्या साहित्याचीही दुरुस्ती करावी, निकामी असलेले साहित्य भंगारात काढावे आणि व्यायाम शाळा सुरु करावी. या व्यायाम शाळेच्या येणाऱ्या भाड्यामधून विद्युतीकरण, रंगरंगोटी, खिडक्यांची कामे, करून घ्यावी तसेही या समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सुचविले होते. मात्र त्यावर देखील अंमलबजावणी झाली नाही.
- विविध खेळांची मैदाने - 14 लाख 33 हजार.
- मल्टी जिम - 13 लाख 75 हजार.
- प्रशासकीय इमारत (इन डोअर हॉल) - एक कोटी पाच लाख 58 हजार.
- खेळाचे साहित्य - 42 लाख 47 हजार.
- ड्रेनेज व्यवस्था - पाच लाख 55 हजार.
- विद्युतीकरण - 14 लाख 46 हजार.
- अंतर्गत रस्ते - सहा लाख 26 हजार.
- संरक्षण भिंत - 16 लाख 37 हजार.
- क्रीडा साहित्य हॉल - नऊ लाख 11 हजार.
- बॅडमिंटन हॉलचे पत्रे बदलणे - 13 लाख.
- खेळाचे साहित्य - 42 लाख 26 हजार.
- वसतिगृह बांधकाम - 70 लाख 58 हजार.
इतर - 28 लाख 21 हजार असा एकूण चार कोटी 57 लाख 78 हजार एवढा खर्च या क्रीडा संकुलावर झाला आहे. मात्र आजही खेळासाठी या मैदानाचा उपयोग होत नाही.