जालना - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर देशभरातून संताप व्यक्त होत असून पीडित तरुणीचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. बलात्कार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जरी पकडले असले तरी ते जामीनावर सुटतात. त्यांना जामीनावर न सोडता फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जालन्यात तृतीयपंथीयांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
उत्तप्रदेशमधील हाथरस घटनेप्रकरणातील तरुणीला न्याय मिळावा अशी मागणी जालन्यातील तृतीयपंथीयांनी केली आहे. जालना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय गृहमंत्री अमित अमित शाह यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उत्तर प्रदेशामध्ये मागासवर्गीय तरुणीवर सवर्ण समाजातील चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केला. 14 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर पिडीतेवर दिल्ली येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यादरम्यानच तिचा 29 सप्टेंबररोजी मृत्यू झाला.
मानवजातीला काळीमा फासणारी ही घटना आहे. या तरुणीची मान मोडून जीभ कापण्याचाही प्रयत्न केला गेला आहे. गेल्या पाच वर्षात मागासवर्गीय समाजातील लोकांवर अन्याय, अत्याचार होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आता अशा आरोपींना जामीन न देता फाशी देऊन समाजाला न्याय मिळवून द्यावा आणि शासनाला जर हे होत नसेल तर त्यांनी आरोपींना तृतीयपंथीयांच्या स्वाधीन करावे, असेही या निवेदनात म्हटले आहे. निवेदनासाठी सामाजिक कार्यकर्त्या नंदा पवार यांच्यासह अनेक तृतीयपंथीयांची उपस्थिती होती.
काय आहे प्रकरण?
दिल्लीतील निर्भया घटनेप्रमाणेच उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका तरुणीवर सामूहिक अत्याचार झाला होता. पीडित तरुणीवर दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. 14 सप्टेंबरला या तरुणीवर अत्याचार झाले होते. ज्यानंतर आरोपींनी तिला मारुन टाकण्याचा प्रयत्नही केला होता. चार तरुणांनी एका तरूणीवर बलात्कार करुन, तिची जीभ कापली आणि मान मोडल्याचा अत्यंत संतापजनक व अमानुष प्रकार घडला. या अत्याचारानंतर तरुणी बेशुद्ध झाली, ती मेली आहे असे समजून चौघे आरोपी तिला तसेच टाकून निघून गेले.
मात्र, ती बचावली आणि सुरुवातीला उपचारांसाठी अलीगढच्या जे. एन. रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. सोमवारी तिची तब्येत खालावल्याने दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात तिची प्रकृती आणखी ढासळली आणि मंगळवारी तिचा मृत्यू झाला.