जालना - कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर त्याच्या बोटांच्या ठशांचा आणि मोबाईलचा वापर करून पे फोनद्वारे रक्कम पळविल्याची घटना 15 एप्रिलला जालना येथील कोरोना रुग्णालयात घडली.
हेही वाचा - नापिकीमुळे गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जुना जालना भागात राहणाऱ्या कचरू मानसिंग पिंपराळे 40, यांना एका खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर 13 एप्रिलला संध्याकाळी सात वाजता सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या कोविड रुग्णालयात भरती केले होते. 14 तारखेला दुपारी दोन वाजेच्या सुमारास या रुग्णाला अतिदक्षता विभागातून सामान्य विभागात हलविण्यात आले. आणि त्यानंतर दिनांक 15 एप्रिलला सकाळी सात वाजेच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर तेथील कर्मचारी मोमीन मोसिन निसार याने मृत रुग्णाच्या बोटांच्या ठशांचा वापर करून मोबाईलचे कुलूप उघडले आणि त्यामधून पे फोनद्वारे दुपारी दीड वाजेच्या सुमारास स्वतःच्या खात्यावर सहा हजार रुपये वर्ग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन वेळा वर्ग करूनही हे पैसे जात नसल्यामुळे तिसऱ्या प्रयत्नात हे पैसे सुरज योगराज मांडोले या व्यक्तीच्या खात्यावर वर्ग केले. त्यावेळी सहा हजार आठशे एवढी रक्कम त्याच्या खात्यावर वर्ग झाली.

सुरज योगराज मांडोले हा जळगाव येथील तरुण कामानिमित्त जालन्यात राहतो. त्यांची आणि मोमीन मोसिन निसार याची तोंडओळख होती. त्यामुळे, मोमीन याने मांडोले यांच्या खात्यावर पैसे वर्ग केले आणि हे पैसे जमा झाल्यानंतर मांडोले याने दोन मिनिटानंतर लगेच ही रक्कम पुन्हा मोमिन यांच्या खात्यात वर्ग केली. आणि तुर्तास मांडोले हे काही कामानिमित्त जळगावला गेले.
सकाळी सात वाजता रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह शवागारात पाठविण्यात आला होता. दरम्यानच्या काळात मोबाईलवर एटीएमचे ओटीपी घेऊन पिन बदलून आणि मृताच्या ठसा वापर करून हा प्रकार घडलेला आहे. दरम्यान पंधरा तारखेला ही घटना घडल्यानंतर तीन दिवसांनी मृताच्या नातेवाईकांनी मोबाईलची पाहणी केली असता ही रक्कम हडप केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, नातेवाईकांनी या रकमेसोबतच मृताच्या खिशामध्ये उपचारासाठी दिलेले 40 ते 42 हजार रुपये आणि अन्य काही साहित्य होते ते देखील चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे.

यासंदर्भात गुन्हा दाखल करावा म्हणून बुधवार दिनांक 21 रोजी रात्री दहा वाजेपर्यंत मृताचे नातेवाईक कदीम जालना पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. आणि याची दखल घेऊन पोलिसांनी पैसे वर्ग करणाऱ्या मोमीन मोसिन मोमीन निसार या तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केला असल्याची कबुलीही दिली आहे. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल करून न घेता आज सकाळी पोलीस ठाण्यात बोलावले होते. परंतु, दुपारी दोन वाजेपर्यंत मृतांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात गुन्हा न नोंदविता पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊन पोलीस गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ करत असल्याचे म्हटले.
मृत रुग्णाच्या पैशांचा दुरुपयोग करून असे प्रकार होत असतील तर अन्य मृतांच्या बाबतीत काय? असा प्रश्न आता समोर येत आहे. कारण एखादा रुग्ण कोरोनामुळे मृत झाला तर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केल्या जात नाही. तसेच, त्याचा कुठलाही शारीरिक भाग दिसत नाही. त्यामुळे, अशा मृतांच्या अंगावर असलेल्या दागिन्यांचे काय?विशेष करून महिला मृतांच्या अंगावर काही ना काही तरी दागिना असतात, मग या दागिन्यांचे पुढे काय होते? हा प्रश्न देखील आता ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा - जालना : कोविशिल्ड लसीचा साठा संपला; उद्या लसीकरण केंद्र बंद पडण्याची शक्यता