जालना - बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथे तिहेरी तलाकाची घटना घडली आहे. तक्रारदार महिलेच्या तक्रारीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तिहेरी तलाक विरोधातील (विवाह अधिकाराचे संरक्षण) कायद्यानुसार बदनापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. याबाबत मुरूमखेडा (ता. औरंगाबाद) येथील नाझेरा इस्माईल शेख (वय २५) या महिलेने तक्रारी दिली होती.
नाझेरा शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे व शेख इस्माईलचे ९ वर्षापूर्वी लग्न झाले होते. गेल्या दोन वर्षापासून किरकोळ वाद होत असल्याने नाझेरा यांनी इस्माईल विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी ४९८ अन्वये गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून त्या आपल्या माहेरी मुरुमखेडा येथेच राहातात. तर, त्यांची मुलगी सुमेरा ही सेलगाव येथे त्यांच्या पती जवळ राहाते.
मुलीचा अपघात झाल्याने नाझेरा या तिला पाहण्यासाठी २ नोव्हेंबरला सेलगावला आपल्या पतीच्या घरी गेल्या होत्या. मात्र, तेथे दुपारी अडीचच्या सुमारास इस्माईल याने, मला तुला नांदवायचे नाही, मी दुसरे लग्न केले आहे, असे म्हणून नाझेरा यांना तिहेरी तलाक दिला व त्यांना हाकलून दिले. याप्रकरणी बदनापूर पोलिसांनी विवाह अधिकाराचे संरक्षण (तिहेरी तलाक विरोधी कायदा) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - जालना : लॉकडाऊनमध्ये जप्त केलेला लाखो रुपयांचा गुटखा अखेर जाळून नष्ट