जालना - अन्न व औषध प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सदर बाजार पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा पकडला आहे. खरेतर ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाची असताना देखील सदर बाजार पोलिसांनी केली आहे. या कारवाईमुळे अन्न व औषध प्रशासनामध्ये प्रचंड नाराजी आहे आणि ती नाराजी अधिकाऱ्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरून दिसून येत आहे.
राज्यात बंदी असलेला गुटखा पकडण्यात सदर बाजार पोलिसांना यश आले आहे. रविवारी रात्री गस्तीवर असताना पोलिसांना एक संशयित टाटा सुमो वाहन येताना दिसले. या चारचाकीला थांबवायला सांगितले असता ती न थांबल्याने पोलिसांनी तिचा पाठलाग केला. दरम्यान, चारचाकीत असलेल्यांनी गाडी मध्येच थांबवून पळ काढला. पोलिसांनी चारचाकी ताब्यात घेतली असता त्यात त्यांना सफेद रंगाच्या पोतड्यांमध्ये गुटखा, एक मोबाईल आणि ३५ हजार रोख आढळून आले.
हेही वाचा - भोकरदन येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
रात्री पकडलेल्या गुटख्याचा पोलीस अधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाला माहिती दिल्यानंतरही आज(सोमवार) दुपारी १ पर्यंत अन्न व औषध प्रशासनाचा कोणताही अधिकारी पोलीस ठाण्याकडे तपासणी करण्यासाठी फिरकलाही नाही. त्यामुळे या गुटख्या संदर्भातील पुढील तपास रखडला आहे.
हेही वाचा - जालन्यात आरोग्यमंत्री टोपे यांच्या हस्ते शिवभोजन थाळीचा शुभारंभ