जालना - कालच्या (गुरुवारी) बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लॉकडाऊन संदर्भात काहीही म्हणाले नाही. मात्र लॉकडाऊन लावताना समान नियम निकष हवे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. राज्यात दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. लोकांनी नियम पाळावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. ते जालन्यात बोलत होते. पहिल्या डोसपासून 98 लाख लोक वंचित आहे. लसीकरण ऐच्छिक केल्याने अनेकजण लस घेण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे नागरिकांना लसीकरण करण्यासाठी कायदेशीर दृष्टीने लसीकरण ऐच्छिक करता येईल का? याबाबत केंद्राकडे लेखी मागणी केल्याचे देखील टोपे म्हणाले.
मी माळकरी आहे आणि तिसरी लाट ही माळा काढणाऱ्यांसाठी आहे, असे वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी केले आहे. यावर त्यांचे वक्तव्य हे सकारात्मक दृष्टीने घ्यावे, असेही टोपे यांनी म्हटले आहे. इंदोरीकर महाराज हे शाकाहारी आहार घेत असल्याने ते वक्तव्य शाकाहाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी असावे, असे टोपे म्हणाले. ECRP 2 चा निधी वेगाने खर्च करण्यासाठी जटील अटी आणि शर्थी दूर कराव्यात, अशीही मागणी कालच्या बैठकीदरम्यान करण्यात आल्याचे ते म्हणाले. याच बैठकीत लसी आणि ट्रीटमेंट प्रोटोकॉल स्पष्ट करण्याची मागणीही करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
होम टेस्ट किटच्या माध्यमातून घरच्या घरी कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे कळते. मात्र पॉझिटिव्ह आल्यानंतर देखील अनेकजण पॉझिटिव्ह असल्याचे सांगत नाही. त्यामुळे कोण पॉझिटिव्ह आले आहे. हे आरोग्य विभागाच्या रेकॉर्डवर येणे गरजेचे असून अशा किट विकणाऱ्याकडून विकत घेणाऱ्यांच रेकॉर्ड मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे देखील आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. यासाठी देखील केंद्र सरकारने प्रयत्न करणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. राज्याला साडेसहा लाख कोव्हॅक्सीन लसी मिळाल्या असून त्या मुंबईत आलेल्या आहेत. या लसी राज्यात वाटप केल्या जाणार आहेत. अजूनही लसींची आवश्यकता असून 2 ते 3 दिवस हा साठा पुरेल असेही ते टोपे यांनी सांगितले. मुंबईत लहान मुलांच्या लसीकरणाची गती मंदावलेली असून 10 दिवसांत फक्त 12 टक्के लसीकरण झालेले आहे. मात्र असे असले तरी राज्यात लहान मुलांचे 40 टक्के लसीकरण झाले असून अशीच गती राहिल्यास 15 दिवसांत लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वासही राजेश टोपेंनी वर्तविला आहे.