जालना - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आरोग्य मंत्री राजेश टोपे हे कन्नड तालुक्यात देवगाव रंगारी येथून जालन्याकडे जात होते यावेळी त्यांना रस्त्याच्या कडेला एका दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याचे लक्षात आले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी तात्काळ आपली गाडी थांबवली. अपघातग्रस्त व्यक्तीला उपचारासाठी देवगाव रंगारी येथे पाठविले. राजेश टोपे यांनी 108 ला कॉल करून ॲम्बुलन्सगाडीने पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे पाठविले व योग्य उपचार करणेबाबत कळवले.
नागरिकांना केले आवाहन - यावेळी राजेश टोपे यांनी नागरिकांना आवाहन केले की, प्रवास करत असताना रस्त्यात अपघात झालेला दिसल्यास अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करून शासकीय यंत्रणांना सूचित करावे. आपल्या मदतीमुळे अपघात झालेल्या व्यक्तींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळून प्राण वाचू शकतात. त्यामुळे नेहमी मदतीसाठी तत्पर राहिले पाहिजे.
राजेश टोपे यांनी केली अपघातग्रस्ताची मदत - देवगाव रंगारी येथून खाजगी कार्यक्रमातून घरी परतत असताना त्यांना हा अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ त्या अपघात ग्रस्त नागरिकाची मदत केली. त्याला आपल्या ताफ्यातील वाहनाने रुग्णालयात पाठवले. यावेळी त्यांनी स्वतः त्याला उचलून गाडीत टाकण्यासाठी मदत ( Rajesh tope helped to Accident people ) केली. या गोष्टीचा व्हिडिओ त्यांच्या कार्यकर्त्यांनी काढला असून तो समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात चर्चिला जात आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे हे नेहमीच आपल्या कार्यासाठी ओळखले जातात. मात्र त्यांनी आज दाखवलेल्या मानुसकीमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अधिकच भर पडली आहे. राजेश टोपे यांनी केलेली मदत ही सर्व नागरिकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सर्व स्तरातून बोलले जात आहे.