जालना - नाट्यांजली या भरतनाट्यम शिकवणाऱ्या संस्थेच्यावतीने आज रविवारी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. नियमित शालेय शिक्षण घेत असतानाच शास्त्रीय नृत्य प्रकारातील भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनींनी आज या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी विविध नृत्य सादर करून नृत्यप्रेमींची मने जिंकली.
आंध्र प्रदेशातील मात्र आता जालन्यातच स्थिरावलेल्या विद्या राव हे भरतनाट्यम शिकविण्याचे काम करतात. आजच्या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी 'दो शब्दम' हे साहित्याच्या सौंदर्याचे विश्लेषण करणारे नृत्य सादर केले. मूळ तेलुगू भाषेतील शब्द, आपल्या भावना प्रकट करणारे हे नृत्य होते. देवी दुर्गेवर आधारित नृत्यही येथे सादर करण्यात आले. तिच्या विविध रूपांचे दर्शन या नृत्याच्या माध्यमातून दाखविण्यात आले.
जावली या शृंगार नृत्यप्रकारात नायिका आपल्या नायकाची कशी वाट पाहते आणि तो आल्यानंतर तिची कशी धांदल उडते, याविषयीचा नृत्यप्रकार गरिमा सोमानी हिने सादर केला होता. आजच्या या गुरुपौर्णिमेच्याप्रसंगी नृत्य सादर करणाऱ्यांमध्ये सिद्धी अग्रवाल, ऋतुजा कुलकर्णी, गार्गी जड, संस्कृती गर्दास, समृद्धी गर्दास, विधी मुंदडा, पारुल राठी, आस्था लूनिया, सिया जैन आदि विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.