जालना - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कापसाची आवक सुरू झाली आहे. अशात आतापर्यंत 66 हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची माहिती जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रजनीकांत इंगळे यांनी दिली. दरम्यान कापूस विक्रीसाठी संबंधित शेतकऱ्यांचे नातेवाईक किंवा तलाठ्याचा सातबारा आवश्यक असल्याने शेतकरी मात्र हैरान झाले आहेत.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीची मुख्य बाजारपेठ आणि या समितीची उप बाजारपेठ असलेल्या बदनापूर येथे देखील भारत कापूस निगम लिमिटेड (सीसीआय) च्या वतीने कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. पंधरा दिवसापूर्वी उद्घाटनाच्या दिवशी पाच हजार 725 रुपये भाव प्रति क्विंटल याप्रमाणे कापसाला मिळाला होता.
कापसामधील ओलावा कमी जास्त असल्यामुळे भावात देखील चढ-उतार होत आहेत. आज पाच हजार 610 रुपये प्रति क्विंटल असा कापसाला भाव सुरू आहे. या मुख्य बाजार समितीमध्ये आत्तापर्यंत 44 हजार 437 तर बदनापूर उप बाजारपेठेत 22 हजार 156 असा एकूण 66 हजार 593 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे.
हेही वाचा - मतदान यादी दुरुस्तीवरून तहसील कार्यालयात गोंधळ, मतदारांनी केले स्टिंग ऑपरेशन
हेही वाचा - जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे एक पाऊल पुढे; व्हाट्सअपच्या माध्यमातूनही लावणार खटल्यांचा निकाल