जालना - 10 जून हा दिवस जागतिक स्तरावर नेत्रदान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नेत्रदानाचे महत्त्व पटवून दिले जाते आणि त्याविषयी जनजागृतीही करण्यात येते. मात्र भारतामध्ये अद्यापही म्हणावे त्याप्रमाणात नेत्रदानाबाबत जनजागृती झाली नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने अवयव दानाचा कायदा करावा अशी मागणी नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. ऋषिकेश नायगावकर यांनी केली आहे.
वर्षभरात झाले नाही एकही नेत्रदान - नायगावकर
डॉ. ऋषिकेश नायगावकर हे शहरातील गणपती रुग्णालय येथे आपली सेवा देतात. ते सांगतात सध्या कोरोनाचा काळ चालू आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात रुग्णालयात एकही नेत्रदान झाले नाही, त्यामुळे नेत्र प्रत्यारोपनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांची यादी वाढतच आहे. हा आकडा जवळपास एक हजारांच्या आसपास आहे. कोरोनाच्यापूर्वी दर महिन्याला 50 ते 60 नेत्र दाते मृत्यूनंतर नेत्रदान करत होते, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.
अवयवदानासाठी कायदा करावा - नायगावकर
अनेक वेळा मोठमोठ्या प्रदर्शनांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये मृत्यूनंतर अवयव दानासाठी अर्ज भरून घेतला जातो. नागरिक देखील मोठ्या उत्साहाने असे अर्ज भरून देतात. परंतु या अर्जाचे पुढे काय होते, हे मात्र गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे अवयवदानासाठी सरकारने कडक कायदा करावा, ज्याप्रमाणे मृत्यूचे प्रमाणपत्र असते, त्याच धर्तीवर अवयवदानासाठी सुद्धा कायदा असायला हवा अशी मागणी नायगावकर यांनी केली आहे. मृत्यूनंतर डोळे काढल्याने त्याचा कोणताही परिणाम मृत व्यक्तीवर होत नाही. ज्या व्यक्तीने अवयवदानाचा अर्ज भरून दिला आहे, त्या अर्जाची अनेकवेळा नातेवाईकांना माहिती नसते, त्यामुळे अवयदान होत नाही. हा अवयवदानातील मोठा अडथळा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
'मन की बात'मधून नेत्रदानाचे आवाहन करावे - नायगावकर
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दर महिन्याला' मन की बात' मधून जनतेशी संवाद साधतात, आणि त्याचा चांगला परिणाम जनतेवर होताना दिसत आहे. त्यामुळे या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये नेत्रदान करण्याविषयी जनतेला आवाहन करावे असेही यावेळी नायगावकर यांनी म्हटले आहे.
श्रीलंकेमध्ये अवयव दान बंधनकारक
श्रीलंकेमध्ये अवयव दान करणे बंधनकारक करण्यात आले आहे, त्यामुळे तिथे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे डोळे हे तेथील गरजू लोकांना दिले जातात. याच धर्तीवर भारतात अवयवदानाचा कायदा झाल्यास त्याचा गरजू रुग्णांना उपयोग होईल, असंही यावेळी नायगावकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - बंधाऱ्यात बुडालेल्या तिघा भावंडांचे मृतदेह सापडले; सख्ख्या भावांची मिठी हृदय हेलवणारी