जालना - गाईच्या दुधासह दूध पावडरला अनुदान द्यावे अन्यथा एक ऑगस्ट रोजी विविध संघटनांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीने दिला आहे. हा इशारा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे आणि त्यातच आता दुधाचे भावही कमी झाले आहेत. त्यामुळे सरकारने गाईच्या दुधाला दहा रुपये प्रति लिटर तसेच दूध पावडर ला 50 रुपये प्रति किलो अनुदान द्यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे दुधाच्या विक्रीमध्ये 30 टक्केपर्यंत घट झाली आहे. हॉटेल व्यवसाय बंद झाल्यामुळे ही अडचण आली आहे. सद्याच्या परिस्थितीत खाजगी संस्था व सहकारी संस्थांकडून 15 ते 16 रुपये प्रति लिटर दराने गाईच्या दुधाची खरेदी केली जाते. या दरांमध्ये गाईच्या चाऱ्याचादेखील खर्च निघत नाही.
दूध भुकटीसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे, आणि शासनाने तीस रुपये प्रति लिटर प्रमाणे दुधाची खरेदी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आज निवेदन देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत, माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदर्गे, माजी शहराध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, बाबासाहेब कोलते, राष्ट्रीय समाज पक्षाचे सचिव ओमप्रकाश चितळकर यांची उपस्थिती होती.