जालना - जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर जिल्हास्तरीय मुला-मुलींची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मात्र, याठिकाणी मुलींना कपडे बदलण्यासाठी सुरक्षित खोली नाही. तसेच शौचालयाची देखील सोय नाही. यामुळे मुलींची कुचंबणा झाली. तसेच पावसामुळे सामने अर्ध्यावर सोडून खेळाडूंना परतावे लागले. त्यामुळे सर्व विद्यार्थी आणि प्रशिक्षकांनी संताप व्यक्त केला.
जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत 14, 17 आणि 19 अशा वयोगटातील 48 संघांनी नाव नोंदणी केली होती. मात्र, मुलींचे सात आणि मुलांचे 20 असे एकूण २७ संघ प्रत्यक्षात खेळण्यासाठी आले. यामध्ये भोकरदन, घनसावंगी, बदनापूर, जाफराबाद अशा ग्रामीण भागातील खेळाडू सहभागी झाले होते. मात्र, येथील गैरसोयीमुळे अनेक विद्यार्थी संघ अडचणीत आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत आलेल्या प्रशिक्षकांनी देखील क्रीडा विभाग आणि शासनाचा तीव्र निषेध केला.
खेळाच्या मैदानावरचे पाणी बाहेर काढले नाही. याउलट बाहेरचे पाणी मैदानावर येत होते. त्यासोबत प्रेक्षकगृहावर छत नसल्यामुळे प्रेक्षकांचे देखील हाल झाले. खेळाडूंसाठी असलेल्या चेंजिंग रूमला दारे, खिडक्या नाहीत. तसेच याठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे याठिकाणी बसणे देखील कठीण होते, त्यामुळे खेळाडूंनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गेल्या महिन्यात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी या क्रीडा संकुलाची पाहणी करून दुरुस्तीच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांना केराची टोपली मिळाल्याचे दिसत आहे.