जालना- जिल्ह्यातील भोकरदन शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तिसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला आहे. गोपीका बालाजी कऱ्हाळे (वय ९ वर्ष रा.माळी गल्ली) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
हेही वाचा- एजीआर शुल्क भरण्याची आज शेवटची मुदत; एअरटेलने 'ही' घेतली भूमिका
भोकरदन जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आज (गुरुवारी) सहल जाणार होती. दरम्यान, त्याचीच तयारी करत असताना सकाळी साडेपाचच्या सुमारास अंघोळीसाठी जाताना गोपीका पाय घसरून पडली. तोंडावर पडल्याने तिचे दोन दात तिच्या ओठात घुसले. तिला तातडीने उपचारासाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात पाठवले. तेथून तिला जालना येथे घेऊन जात होते. मात्र, प्रवासादरम्यान तिचा मृत्यू झाला.
भोकरदन येथील केळणा नदीकाठी खडकेश्वर येथे तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपीकाच्या मृत्यूने भोकरदन शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तिच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी, एक भाऊ, असा परिवार आहे.