जालना : गेल्या दोन दिवसांत पावसाने जालना जिल्हाला झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील सर्वच जलाशय भरण्याच्या मार्गावर आहेत. आज जालना शहराला पाणीपुरवठा करणारे घाणेवाडी जलाशय (संत गाडगेबाबा जलाशय) पूर्णतः भरले असून 18 फूट पाणी या जलाशयात जमा झाले आहे. त्यामुळे नवीन जालन्याच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. पुढील 18 महिने तरी जालना वासियांना पिण्याच्या पाण्याची काळजी मिटली आहे.
निजामाच्या काळातील आहे जलाशय -
घाणेवाडी जलाशय हे जालन्यापासून 9 किलोमीटर अंतरावर असून घाणेवाडी जलाशयातून झिरो ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून शहरास पाणी पोचवले जाते. यात कोणत्याही प्रकारची वीज वापरली जात नाही निजामांच्या काळातील हे जलाशय असून कोणत्याही प्रकारचा वीज खर्च यासाठी नगरपालिकेला येत नाही. दरम्यान, मागील दोन वर्षांपासून समस्त महाजन ट्रस्त मुंबई व यांच्यासारख्या दीडशे सेवाभावी संस्थांनी या जलाशयाचे खोलीकरण व गाळ काढण्याचे काम केले आहे. त्यामुळे घाणेवाडी जलाशय हा पूर्ण क्षमतेने भरला आहे.