जालना - बदनापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी आठवडी बाजार भरल्यानंतर शनिवारी घाणीचे साम्राज्य पसरलेले पहायला मिळते. शनिवारी दुपारपर्यंत ही घाण साफ होत नसल्यामुळे परिसरातील व्यापाऱ्यांना तसेच स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
या बाजारात पंचक्रोशीतून लोक येतात. शुक्रवारी बाजार उशिरापर्यंत सुरू असतो. त्यामुळे रात्री व्यापारी निघून गेल्यानंतर या परिसरात प्रचंड प्रमाणात कचरा व घाण साचते. या ठिकाणची साफसफाई नगर पंचायतच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी पहाटे येऊन करणे अपेक्षित आहे. नगर पंचायतने साफसफाईचा कंत्राट देतानाच संबंधित कंपनीला व्यापारी संकुले असलेल्या ठिकाणी दिवसातून सकाळी व सायंकाळी अशी दोन वेळी साफसफाई करण्याची अट घातलेली आहे. मात्र, कर्मचारी शनिवारी १० ते ११ पर्यंत या ठिकाणी साफसफाईसाठी येतच नाहीत. त्यामुळे या ठिकाणी शनिवारची सकाळ प्रचंड घाणीत सुरू होते.
हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाच्या वाहनातून चालतात वाळू माफियांचे ट्रक, प्रशासनाची दिशाभूल
कंपनीचे कर्मचारी बाजार समितीमधील बाजारात स्वच्छता मोहीम केवळ दिखाव्यापुरतीच करत असल्याचा आरोप केला जात आहे. व्यापाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. इतर बाजारांच्या तुलनेत भाजीपाला बाजारात सार्वधिक कचरा निर्माण होतो. कचरा वेळेवर उचलला जावा, अशी मागणी केली जात आहे. काही दुकानदार स्वत:च दुकानांची स्वच्छता करून परिसर स्वच्छ ठेवतात. या ठिकाणी सकाळी मोठया प्रमाणात तरुण व बदनापूर शहरातील ग्रामस्थ व्यायाम करण्यासाठी येत असतात. परंतु शनिवारी पहाटे घाणीमुळे त्यांचाही हिरमोड होतो. दरम्यान, नगर पंचायतचे सभापती संतोष पवार यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, त्यांनी संबंधित सफाई कंत्राटदाराला पुढील शनिवारपासून पहाटे लवकर साफसफाई करण्याचे आदेश देण्यात येतील असे सांगितले आहे.