जालना - जाफ्राबाद तालुक्यातील बोरगांव फदाट येथील वीर जवान गणेश श्रीराम फदाट गुरुवारी सकाळी 6 वाजता रनिंग करून आल्यावर हृदयविकाराच्या झटक्याने सिकंदराबाद येथील मुख्यालयात निधन झाले होते. यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा प्रेम याने त्यांना मुखाग्नी दिली. ते हैदराबाद येथे 25 वर्षांपासूनपासून सैन्यदलात सुभेदार म्हणून कार्यरत होते.
गणेश फदाट यांच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार -
आज सकाळी १२ वाजता त्यांचे पार्थिव मूळगावी बोरगाव बु येथे दाखल झाले होते. त्यांचे पार्थिव मारोती मंदिरासमोर आंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर बोरगांव बु. येथील मोकळ्या प्रगणांत सुभेदार गणेश फदाट यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीय, मित्रपरिवारासह जिल्हाभरातून हजारो नागरिक बोरगाव बु. येथे दाखल झाले होते. यावेळी गावातून निघालेल्या अंत्ययात्रेत देशभक्तीपर गीते वाजवली जात होती.
कोण आहेत सुभेदार गणेश फदाट -
वीर जवान गणेश फदाट यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला होता. त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय असा मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचे लहान भाऊ दिनेश फदाट हे देखील सैन्यदलात कार्यरत आहे.
हेही वाचा - चर्चेची अकरावी फेरी : बैठकीत तोडगा नाही; प्रजासत्ताक दिनी दिल्लीत 'ट्रॅक्टर रॅली'