जालना - हॉटेल ऋतुराज बियरबारमध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात पकडलेल्या आरोपींवर बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये आणखी कलम वाढणार असून यामध्ये पकडलेल्या पीडित मुली अजूनही बालसुधारगृहातच आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या घाणेवाडी शिवारातील हॉटेल ऋतुराजमध्ये 17 ऑक्टोबर रोजी छापा टाकला होता. या हॉटेलचा मालक गोविंद रमेश बावणे व त्याचा नोकर राजू बबनराव पैठणकर दोघेही रा. घाणेवाडी यांनी हॉटेलमधील खोल्या भाड्याने देत तरुणींना बोलावून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले होते. यावेळी हॉटेल मालक गोविंद रमेश बावणे व त्याचा नोकर राजू बबनराव पैठणकर यांच्यासह एक मुलगी, एक २२ वर्षीय तरुणी त्याचबरोबर, ग्राहक सुनील विलास मरकड (रा. गोंदी तालुका, अंबड, मु. चंदनझिरा) व संदीप मिठू गवळी (रा. योगेश नगर, जालना) यांना पोलिसांनी रंगेहात पकडले होते.
या प्रकरणातील एक मुलगी ही अवघ्या सतरा वर्षांची निघाली आहे. आपल्या मित्रासोबत सोळा वर्षे पूर्ण झाल्यानंतर वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे आली होती. ही अल्पवयीन मुलगी जालन्यात तिच्या विवाहित बहिणीकडे राहत होती. तसेच याच प्रकरणातील दुसरी 22 वर्षीय तरुणी ही अविवाहित असून परतूर तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत आहे. या दोन्ही पीडितांची न्यायालयाच्या आदेशानुसार महिला व बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
या प्रकरणांमध्ये पोलिसांनी वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी हॉटेलच्या चालक-मालक दोन ग्राहक यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. खरे तर या प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुली संदर्भात तिच्यासोबत असलेल्या दुसऱ्या तरुणावर बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणाची चर्चा नंतर सुरू झाल्यानंतर आता पुन्हा या प्रकरणात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कलम वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती या प्रकरणाचे तपासणी अधिकारी तथा चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे यांनी दिली आहे.