जालना - समाजाचा तृतीयपंथीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन चुकीचा असण्यामागे काही बहुरूपी कारणीभूत आहेत. मात्र जे खरोखरच तृतीयपंथी आहेत अशा जालन्यातील तृतीयपंथीयांनी एकत्र येत समाजाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, या अपेक्षेतून सुमारे एक कोटी रुपये खर्च करून एक सुसज्ज घर बांधले आहे. या नूतन वास्तूचा गृहप्रवेश 30 जानेवारीला होणार आहे. हैदराबादला स्थलांतरीत होण्यापूर्वी 400 वर्षांआधी या तृतीयपंथीयांचे पूर्वज जालना शहरात वास्तव्याला होते. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी ज्या भूमीवर जीवन व्यतीत केले तिथेच पुन्हा एकदा आपल्यााठी हक्काची वास्तू उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
या घरामध्ये सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा आहेत. कोरीव काम केलेले सागवानाच्या लाकडातील दरवाजे, खिडक्यांना शोभनीय पडदे, वातानुकूलित यंत्र यासोबतच छताला विद्युत रोशनाई करून आकर्षक रंग देण्यात आला आहे. पूर्ण इमारतीमध्ये कुठल्या हॉलमध्ये काय चालू आहे हे पाहण्यासाठी इथे सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. दोन्ही मजल्यावर आधुनिक पद्धतीचे स्वयंपाक घर आहे. यामध्ये चिमणी, फ्रिज, गॅस शेगडी पाहायला मिळते.
या घराविषयी बोलताना काजल सांगतात की, "आमच्या पूर्वजांचा चारशे वर्षांपूर्वी जालन्यामध्ये जन्म झाला होता. त्यामुळे हे शहर आमच्यासाठी विशेष महत्त्वाचे आहे. आमच्या समाजातील अनेकांची इच्छा होती की, आपल्या पूर्वजांनी ज्या शहरात वास्तव्य केले, ज्या शहरात त्यांचा जन्म झाला त्या शहरात आपणही वास्तव्य केले पाहिजे. त्यामुळे आता या इमारतीमध्ये आमच्या समाजातील बाहेरगावाहून आलेल्यांची व्यवस्था होणार आहे. त्यासोबतच कुणी चुकीच्या मार्गाने जात असेल तर, त्याला वेळीच आवर घालून योग्य मार्गावर आणण्यासाठी या वास्तूचा उपयोग होणार आहे."
हेही वाचा - 'फडणवीस सरकारच्या काळात १५ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या याचे उत्तर द्यावे'
कोणतीही जात, धर्म नसलेल्या या तृतीयपंथीयांची एकच समाज आणि एकच जात आहे, ती म्हणजे 'तृतीयपंथी'. समाजामध्ये विविध नावांनी यांना हिनवले जाते. मात्र, खरे तृतीयपंथी कधीही कोणालाही त्रास देत नाहीत. अशा या तृतीयपंथीयांनी समाजाची मदत घेऊन जालना शहरात एक सुसज्ज घर बांधले आहे. या घराचा वापर ते त्यांच्या परिवारासाठी तसेच त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी करणार आहेत. त्यासाठी अनेक तृतीयपंथी एकत्र आले आहेत. त्यांनी 400 वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांच्या घराच्या ठिकाणीच पुन्हा आपले नवीन घर बांधून पूर्वजांची आठवण जागृत केली आहे.
काजोलने सांगितल्यानुसार, आम्ही जे आहोत त्यामध्ये समाधानी आहोत. लहानपणीच घरच्यांनी आमच्यामधील काही लक्षणं समोर आल्यामुळे समाजापासून स्वतःची इज्जत झाकून ठेवण्यासाठी आम्हाला कुठेतरी सोडून दिलेले असते. त्यामुळे आम्ही आमच्या परिवारात एकत्र राहून सुरक्षित असल्याचे समजतो. आम्ही आमचा परिवार जपतो. परंतु, रेल्वेमध्ये, दुकानांमध्ये आणि अन्य ठिकाणी जनतेसोबत गैररव्यवहार करून काही बहुरूपी आमचे नाव खराब करत आहेत. खरतर ते तृतीयपंथी नाहीत, ते विवाहित आहेत. त्यांना मूलबाळ देखील आहेत. मात्र, चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्यासाठी ते बहुरूपी म्हणून फिरतात आणि लोकांना त्रास देतात. त्यामुळे आमचेही नाव खराब होत आहे. हा प्रकार त्या बहुरूपी यांच्या देखील लक्षात येतो आणि म्हणून आम्ही दिसताच ते पळून जातात. काजोल पुढे सांगते, आम्ही तृतीयपंथी कोणालाही त्रास न देता उलट धार्मिक कार्य पार पाडण्यासाठी पुढाकार घेतो. त्यामध्ये सन्मानही मिळतो. या बदल्यात आम्ही त्यांना कधीही त्रास न देता आशीर्वाद देतो. त्यामुळे समाजातील दानशूर, धार्मिक व्यक्ती आवर्जून आम्हाला बोलावून आमचाही मानसन्मान करतात आणि अशा व्यक्तींच्या जीवावरच आम्ही आज उभे आहोत. समाजाने केलेल्या मदतीमुळेच आमचे घर झाले आहे.आमच्या समाजामध्ये एकच नातं आहे आणि ते म्हणजे 'गुरू-शिष्याचं'. आम्हाला सांभाळणारा गुरू आणि त्यातून पुढे येणारा शिष्य. या एका नात्याशिवाय कुठलंही नातं आमच्यामध्ये नसतं. त्यामुळे तरुणपणी देखील आम्हाला याचा गर्व होत नाही आणि उतारवयात देखील आपलं कसं होईल? याची भीती वाटत नसल्याचे काजोल यांनी सांगितले.
हेही वाचा - मुंबईमध्ये ओवेसींच्या सभेपूर्वी 'दुर्गावाहिनी'च्या महिला कार्यकर्त्यांचा राडा
सर्वजण एकत्र राहत असल्यामुळे एक दुसऱ्याची काळजी आमच्या परिवारात घेतली जाते. आज तृतीयपंथीयांनी देखील विविध क्षेत्रांमध्ये नाव कमवले आहे. शासकीय सेवेत आणि राजकारणात देखील आम्ही पाऊल टाकले आहे. याचसोबत आमच्या समाजामध्ये येणाऱ्या नवीन पिढीने देखील शिकले पाहिजे, पुढे गेले पाहिजे, अशी आमची भावना आहे. त्यासाठी गरज पडली तर आम्ही शिक्षकांना घरी बोलावून इच्छुक तृतीयपंथीयांना शिक्षण देऊ, अशी ग्वाहीदेखील काजोल यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना दिली.