जालना- गरीब महिलांसाठी मोफत कपडे वाटप सुरू आहे, ते कपडे तुम्ही घ्या!आणि मलाही द्या, असे म्हणत एका तरुणाने घरकाम करणाऱ्या वृद्ध महिलेला लुबाडल्याची घटना घडली. सखूबाई विश्वनाथ रत्नपारखे (६५) असे त्या महिलेचे नाव असून कदीम जालना पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मोफत कपड्यांचा नादात लुबाडले
सखूबाई नूतन वसाहत भागात घरकाम करतात. त्यांचा मोठा मुलगा संजय तिथूनच जवळ असल्यास शिवनगरमध्ये राहतो. त्याला भेटण्यासाठी म्हणून सखुबाई बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सामान्य रुग्णालयाच्या बाजूने जात होत्या. तेवढ्यात त्यांना २५ वर्षाचा तरुण भेटला आणि आजी तुम्ही कपडे घेतले आहेत का? नसतील घेतले तर समोरच्या रस्त्यावर गरीब व्यक्तींसाठी मोफत कपडे वाटप चालू आहे ,तुम्हीही चला ,तुम्ही घ्या आणि मला घेऊन द्या असं म्हणत पन्नास रुपयाची नोट सखुबाईंच्या हातात ठेवली. त्यानंतर सखुबाई थोडे पुढे गेल्यावर आणखी एक चाळीस वर्षे वयाचा व्यक्ती त्यांना भेटला आजी बाई माझे शंभर रुपये घ्या आणि आम्हा दोघांनाही तुम्ही त्या ठिकाणावर गरीब सांगा आणि आम्हाला कपडे मिळवून द्या, असे म्हणला.
१६ हजार ७०० रुपयांना गंडा
मोफत कपडे घेण्यासाठी व्यक्ती गरीब दिसायला पाहिजे म्हणून या दोन्ही भामट्यांनी सखुबाईंना रस्त्याच्या बाजूला नेले आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याचे ५० मनी, कर्णफुले काढून घेतले. तसेच त्यांच्या पिशवीमधील सातशे रुपये असा एकूण १६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सखूबाई मोफत कपडे वाटप होणाऱ्या जागेवर जाऊन आल्यानंतर या दौघांपैकी त्यांना कोणीच दिसले नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाली असल्याचे सखूबाईंच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. कदीम जालना पोलीस ठाण्यात त्या दोन अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.