जालना - भोकरदन शहरात कोरोना महामारीने हळूहळू आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. आज शहरातील तुळजाभवानी नगर येथील एक तर बाजारपट्टी परिसरात या पूर्वीच क्वारंटाईन असलेल्या पैकी एक जण कोरोनाबाधित आढळला आहे. आज दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने शहरातील रुग्णांची संख्या अकरा झाली असून त्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
शहरात धिम्या गतीने रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनासह नागरिक ही हवालदिल झाले आहेत. शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने शहरात पुन्हा जनता कर्फ्यू पाळण्यात येऊन कोरोनाची साखळी तोडण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरिक करत आहेत.
शहरात सध्या जवळपास सर्वच व्यवहार सुरळीत सुरू झालेले आहेत. त्यामुळे शहरात नागरिकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. त्यातच नागरिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे व्हायचा तोच परिणाम होत आहे. शहरात हळूहळू रुग्ण वाढत आहेत. दरम्यान, प्रशासनाने दोन्ही रुग्णांच्या संपर्कातील जवळपास 31 जणांना क्वारंटाईन केले असून कोरोनाबाधित रुग्णापैकी एक रुग्ण भोकरदन येथील कोविड सेंटर येथे, तर एका रुग्णाला उपचारासाठी जालना येथे हलवण्यात आल्याचे नगर परिषदचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगे यांनी सांगितले आहे.