जालना - जालना दिनांक 30 शेअर मार्केटची बनावट वेबसाइट तयार करून चांगला नफा करून देतो, असे सांगत एका शिक्षकाची 2 लाख 32 हजार रुपयांना फसवणूक झाली आहे. यासंबंधी पोलिसांनी आंतरराज्य टोळीला जेरबंद केले आहे. या टोळीतील पाच जणांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरलेले साहित्य आणि रोख रक्कम असा सुमारे 13 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
जालना शहरालगत चौधरी नगर परिसरात राहणारे शिक्षक लक्ष्मण कोंडीबा मुळे यांना शेअर मार्केटमधून नफा करून देण्यासंबंधी मध्यप्रदेशातील काही तरुणांनी फोन केले. तसेच वेबसाइटवर याविषयी माहिती दिली. त्यानंतर मुळे यांनी आरोपींना रक्कम दिली. याचा सुरुवातीला चांगला मोबदला देखील मिळाला. मात्र त्यानंतर दिनांक 19 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान या टोळीने मुळे यांच्याकडून विविध खात्यांमध्ये काही रक्कम जमा करून घेतली. परंतू पैसे परत केलेच नाहीत. वेगवेगळ्या कॉलसेंटर वरून नंबर येत असल्याचे कळताच मुळे यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली.
मुळे यांच्यासोबत www.moneygrowthsolution.com आणि www.redinvestore.com या दोन वेबसाइटवरून संपर्क करण्यात आला होता. तसेच या वेबसाइट शेअर मार्केटशी संबंधित असल्याचा विश्वास देण्यात आला होता. याच माध्यमातून देवाणघेवाणही सुरू होती. त्यानंतर होणारे संभाषण चुकीचे वाटत असल्याने मुळे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी 18 ऑक्टोबरला तालुका जालना पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. यावेळी दिलेल्या या माहितीनुसार पोलिसांनी तपास चक्रे फिरवत संबंधित आरोपींचे मोबाइल व बँक खाते तपासले.
या आरोपीचे कॉल सेंटर मध्यप्रदेशातील निमुच या जिल्ह्यामध्ये असल्याचे लक्षात आले. त्या दिशेने पोलीस पथक रवाना झाले. या पोलीस पथकाने मंदसौर जिल्ह्यातील कवला गावात राहणाऱ्या गणेशकुमार कैलाशचंद्र केवट (वय 24), उमेश जगदीश गौर (वय 23), मांजलपूर येथील श्रीकांत देवकिसंजीत मीना (वय 22) ,मानसिंग रामदयाल गुजर (वय 23), आणि हनी मंगल तोतला (वय 23) या पाच जणांना अटक केली. त्यांच्या बँक खात्यात असलेले पाच लाख रुपये गोठविण्यात आले आहेत. तसेच आरोपींनी गुन्ह्यामध्ये वापरलेले दोन संगणक, एक हार्डवेअर, एक लॅपटॉप, दोन वाय-फाय राऊटर, 12 मोबाइल, पंधरा डेबिट कार्ड, आठ विविध बँकांचे चेकबुक आणि एक चारचाकी असा एकूण 13 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, आरोपींना जालन्यातील न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 2 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी वडते, रामेश्वर मुळक, किशोर तराळ, प्रसाद जारवाल, बालाजी पितळे ,अरुण मुंडे, अशोक राऊत,चौरे आणि स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी सागर बाविस्कर यांच्या टीमने हा गुन्हा उघडकीस आणला. दरम्यान जप्त केलेल्या साहित्याची उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी पाहणी केली आहे.