जालना - मोगली एरंडीच्या बिया खाल्ल्यामुळे पाच लहान मुलींना विषबाधा झाल्याची घटना घनसांवगी तालुक्यातील डहाळेगाव येथे घडली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास या पाचही मुलींना तत्काळ उपचारासाठी जालना येथील सिव्हील रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपाचार सुरू करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना औरंगाबादमधल्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घनसावंगी तालुक्यातील डहाळेगाव येथील स्वरा अमोल जाधव( अडीच वर्षे), अनुष्का अमोल जाधव (6), अनुष्का दिगंबर मस्के(5), रोषनी बाबासाहेब मस्के (4) आणि तेजस्विनी बाबासाहेब मस्के (6) या बहिणींनी घराच्या परिसरात खेळत असताना, चुकून एरंडीच्या बिया खाल्ल्या होत्या. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्यांना उलट्याचा त्रास सुरू झाला. यावर मस्के कुटुंबीयांनी तत्काळ गावातील सरपंच भाऊराव धोंडीबा मुके यांना संपर्क साधून मुलींना तातडीने जालन्यातील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
या बियांची बाधा झालेल्या पाचही मुलींना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. पाच ही मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना औरंगाबाद घाटी रुग्णालयात भरती करण्याची सूचना येथील डॉ. राठोड यांनी केली. त्यानंतर पाचही मुलींना औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.