जालना - एसटी महामंडळामध्ये वाहक-चालकांच्या भरती प्रक्रियेसाठी तरुणांना तंदुरुस्ती प्रमाणपत्राची गरज होती. मात्र, शासकीय रुग्णालयात अनेक चकरा मारून देखील त्यांना प्रमाणपत्र मिळाले नाही. तरुणांची पिळवणूक झाल्यानंतर आज बुधवारी हे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला.
एसटी महामंडळामध्ये नुकतीच वाहक-चालकाची भरती झाली. ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून हे प्रमाणपत्र दिले जाते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हे गरजू तरुण शासकीय रुग्णालयात प्रमाणपत्रासाठी चकरा मारत होते. मात्र, विविध कारणे सांगून कार्यालयात नसलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक एम. के. राठोड यांच्यामुळे हे प्रमाणपत्र रखडून पडले होते. जिल्ह्यातीलच नव्हे तर दुसऱ्या जिल्ह्यातील तरुण याठिकाणी चकरा मारत होते.
घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात पत्रकार येणार असे कळताच दौऱ्याच्या तयारीसाठी गेलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राठोड हे एका तासात रुग्णालयात हजर झाले. त्यानंतर प्रमाणपत्रांवर सह्या करण्यास सुरुवात झाली. गेल्या दोन दिवसांपासून थप्पी लागलेले प्रमाणपत्र पटापट सह्या करून देण्यात आले. या प्रकरणात पैश्याची झालेली देवाण-घेवाण देखील झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही पिळवणूक का झाली? यासंदर्भात डॉ. राठोड यांना प्रश्न विचारला असता त्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. ते म्हणाले, मी मिटींगला गेलो होतो. तसेच सोमवार आणि मंगळवारी अशाप्रकारचे प्रमाणपत्र देण्यात येतात. मग काल मंगळवार असताना प्रमाणपत्र का दिले नाही? असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.