जालना - राजूर ते पैठण जाणाऱ्या महामार्गाचे काम रखडलेल्या अवस्थेत आहे. रोषणगाव येथील पुलाच्या कामामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका शेतकऱ्याच्या पाच एकर शेतीमध्ये प्रचंड पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे त्याने लावलेले पाच एकर कापूस बियाणे वाया गेले. शनिवारी सकाळी हे पाणी काढून पुलाच्या बाजूने नाली करण्याचे काम करण्यात आल्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक विस्क्ळीत झाली. या विस्कळीत वाहतुकीचा फटका या कामासाठी पुढाकार घेणारे आमदार नारायण कुचे यांनाही बसला. त्यांची गाडी या ठिकाणी अर्धा तास अडकून बसली.
राजूर ते पैठण हे तीर्थक्षेत्र जोडण्याच्या उद्देशाने मागील तीन वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम अतिशय धिम्म्या गतीने सुरू असल्याचे दिसून येते. रस्त्याचे काम झाले असले, तरी या रस्त्यावरील सर्व पुलांचे काम मात्र अर्धवट अवस्थेत आहे. अशाच एका अर्धवट अवस्थेत असलेल्या एका पुलाचे काम रोषणगाव परिसरात आहे. या ठिकाणी पावसाळा सुरू झाल्यानंतरही कंत्राटदाराने पाणी वाहून जाण्यासाठी नियोजन न केल्यामुळे या रस्त्याच्या बाजूला गट क्रमांक 311 मध्ये सोमनाथ लक्ष्मण सातपुते यांच्या पाच एकर शेतात शुक्रवारी झालेल्या पावसाचे पाणी तुंबले. सातपुते यांनी मागील आठवडयात या चार एकर शेतीत कापूस लागवड केलेली होती. पावसानंतर बी उगवले की नाही, हे बघण्यासाठी ते शनिवारी पहाटे शेतात गेल्यांनतर त्यांना त्या शेतीत तलाव तुंबल्याचा प्रकार दिसून आला.
पुलाचे काम सुरू असल्यामुळे सातपुते यांनी शेतीतून रस्त्यासाठी जागा दिलेली होती. असे असताना कंत्राटदाराने मात्र या ठिकाणी पाणी जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था न केल्यामुळे या शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर शनिवारी सकाळी या ठिकाणी पोकलँड व इतर साहित्य आणून हे पाणी काढण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. याच दरम्यान या महामार्गाच्या कामासाठी पुढाकार घेतलेले आमदार नारायण कुचे हेही अंबडकडे जाण्यासाठी या रस्त्याने आले. काम सुरू असल्यामुळे त्यांचे वाहनही या ठिकाणी जवळपास अर्धा तास अडकून पडले. यावेळी आमदार नारायण कुचे यांनीही शेतकऱ्यांशी चर्चा करून त्याच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सदरील शेतकऱ्याचे कंत्राटदाराच्या वेळकाढूपणामुळे नुकसान झाले. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.