जालना - भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहे. भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी कर्ज, काढून तसेच दाग-दागिने गहाण ठेवून खते, बी-बियाणे खरेदी पेरणी केली होती. सुरवातीला कमी पाऊस झाल्याने अर्ध्याहून अधिक पिके जळून गेली. त्यानंतर पाऊस चांगला झाल्याने बाजरी, मका, सोयाबीन हि पिके चांगली आली. पिके काढणीला येताच परतीच्या जोरदार पावसामुळे सोंगणी केलेली पिके भिजून त्याला कोंब फुटल्याने हातातोंडाशी आलेले पिक वाया गेले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
हेही वाचा - अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा
शेतकरी या संकटातून सावरत शेतामधील भिजलेली पिके उन्हात वाळवून पिकांची मळणी करून बाजार पेठेत विक्रीसाठी आणत आहेत. मात्र, पावसाने पिके खराब झाली असल्याने माल कवडीमोल भावात विकावा लागत आहे. शेतीवर झालेला खर्च निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. खरेदी केलेला माल खराब झाल्याने व्यापारी सुध्दा आर्थिक अडचणीत आला आहे. बाजार पेठेत चांगला मालच येत नसल्याने खरेदी करताना अडचण निमार्ण होत आहे. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.