जालना - चारा छावणी उभी करून जनावरांच्या चारा प्रश्न सुटला. मात्र, त्यांना सांभाळण्यासाठी शेतामध्ये आलेल्या माणसांच्या चारा-पाण्याचा प्रश्न कोण सोडवणार? त्यासाठी जिथे चारा छावणी तिथे झुणका-भाकर केंद्र सुरू करावे, अशी मागणी अंबड तालुक्यातील नांदी येथील छावणीतील पशुपालकांनी केली आहे.
अंबड तालुक्यातील नांदी येथे ज्ञानसागर शिक्षण संस्थेच्यावतीने चारा छावणी सुरू करण्यात आली. परिसरातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे या चारा छावणीत आणली आहेत. मात्र, या जनावरांसोबत बसण्यासाठी त्यांना चारा, पाणी टाकण्यासाठी घरातील मंडळींना येथे थांबावेच लागते. त्याचसोबत शेतामध्येदेखील काही काम नसल्यामुळे पूर्ण परिवाराच या जनावरांच्या चारा छावण्यांमध्ये विसावलेला दिसत आहे.
त्यामुळे या जनावरांच्या चारा, पाण्याचा प्रश्न जरी या छावणीमुळे सुटला असला तरी त्यांच्यासोबत असलेल्या पशुपालकांनादेखील गावांमध्ये पाणी उपलब्ध नाही. तसेच गावापासून छावणीपर्यंत प्रत्येक वेळी जाणे-येणे करणेही शक्य नाही. त्यामुळे याचठिकाणी शासनाने झुणका-भाकर केंद्र सुरू करावे, अशी मागणीही चारा छावणीतील पशुपालकांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन मागणी करणार असल्याचेही येथील शेतकऱ्यांनी सांगितले.