जालना : जून महिन्याच्या 24 व 25 तारखेच्या मध्यरात्रीनंतर रोषणगाव मंडळासह बदनापूर-अंबड सीमेवरील गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतवस्तीवरील घरवापराच्या साहित्यापासून ते शेतीयोग्य अवजारे वाहून गेली होती. खरिपाची दुबार केलेली पेरणीही वाया गेली. जिल्हाधिकारी, मंत्री, केंद्रीय मंत्री, आमदार यांनी तातडीने पहाणी करून पंचनामे करण्याचे आदेशही दिले. पण, एक ते दीड महिना उलटला तरी प्रशासन कागदी घोडे नाचवत असून शेतकऱ्यांना मात्र, अद्यापही मदत न मिळाल्याने शेतकरी त्रस्त आहेत.
जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बदनापूर-अंबड तालुक्यातील रोषणगाव मंडळात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. खरिपाची केलेली पेरणी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. या मंडळातील रोषणगाव, वाकुळणी, धोपटेश्वर, अंबडगाव, नानेगाव, मांजरगाव, बाजार वाहेगाव, कस्तुरवाडी, चिकनगाव अवा, अंतरवालासह इतर गावांनाही याचा तडाखा बसला होता. शेतीवस्तीवर राहणाऱ्यांचे घरे पाण्याने वाहून गेली. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू नसल्याने कित्येक कुटुंबीय उघड्यावर पडली आहेत. कित्येक शेतकऱ्यांच्या विहीरी गाळ भरून बुजल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांनी पुन्हा पदरमोड करून खरिपाची लागवड केली. पण त्यानंतरही या मंडळात दोनदा जोरदार पाऊस झाल्याने या भागातील जवळपास सर्वच पेर, फळबागा वाहून गेल्यामुळे दुबार पेरणी करूनही पिके आलेली नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांनी शासनाकडे मदतीची अपेक्षा केली आहे.
एका दिवसात 208 मि.मी. पाऊस पडल्यामुळे झालेल्या नुकसानीबाबत आपत्कालीन मदत तात्काळ देण्याची आवश्यकता आहे. विशेष म्हणजे या अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, आ. नारायण कुचे यांनी पहाणी करून तात्काळ पंचनामे करून भरपाई देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी या भागाची पाहणी करून थेट भरपाईसाठी या विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांना संपर्क साधून मदतीची मागणी केली होती. तर, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार संतोष सांबरे यांनीही या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळेल असे सांगितले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनीही आमदार कुचे यांच्यासोबत या भागाचा दौरा करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे जाहीर केले होते. त्या नंतर महसूल विभागाने ही पंचनामे करून अहवाल सादर केल्याचे समजते.
मात्र, पाठपुरावा नसल्यामुळे अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवत असून एक ते दीड महिना उलटल्यानंतरही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नसल्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. याबाबत देशगव्हान येथील शेतकरी शिवाजी कराड यांनी अतिशय तीव्र प्रतिक्रिया दिली. यावर्षी सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कपाशी, तूर तसेच सोयाबीन आदी पीकं उध्द्वस्त झाली आहेत. प्रशासन, नेते फक्त पाहणी करून गेले मात्र, नंतर परिस्थिती जैसे थेच आहे. शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली, त्यामुळे उत्पादन खर्च लक्षात घेता हेक्टरी ४० हजार रुपये आर्थिक मदत या शेतकऱ्यांना द्यावी अशी त्यांनी मागणी केली.