जालना - जालना जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर झाला आहे. दुष्काळामुळे मागील ३ महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. यासंदर्भात शेतकरी संघटनेने प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन, आंदोलने करून, मोर्चे काढून त्यांची कैफियत मांडली. मात्र, प्रशासनाने शेतकऱ्यांची दखल घेतली नाही.
त्यामुळे शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱयांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जनावरे आणली. या प्रकारामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला. दरम्यान, ५ तारखेपर्यंत शासनाने चारा छावण्या सुरू केल्या नाही, तर तीव्र आंदोलनचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
चारा छावण्या आणि बांधावर चारा द्यावा, या मागणीसाठी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गोशाळा चालक, आणि शेतकऱ्यांनी मोर्चा काढून जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते. त्यानंतर एका शेतकऱ्याने गोशाळेला चारा पुरवठा करावा, या मागणीसाठी २३ जानेवारी ३० जानेवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ७ दिवस उपोषण केले होते. तरीदेखील शासनाला फरक पडला नाही. त्यामुळे आता शेतकरी संघटनेने आपली जनावरेच जिल्हाधिकारी कार्यालयात आणली.
जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न मिटवावा, मजुरांच्या हाताला काम द्यावे, तसेच तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक हे गावात राहत नाहीत. त्यांच्यावर कारवाई करावी, या मागण्यांचे निवेदन शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी दत्तात्रय कदम, शिवाजी लकडे, अशोक आटोळे, कृष्णा पिसोर यांची उपस्थिती होती.