जालना - सततच्या नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याने शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. भोकरदन तालुक्यातील देहेड गावात ही घटना घडली. गणेश गंजीधर बावस्कर (वय २७) असे शेतकऱ्याचे नाव आहे.
![farmer committed suicide in bhikardan jalna](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9224463_460_9224463_1603030313206.png)
सकाळी फिरायला गेलेल्या तरुणांना झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसल्याने ही घटना उघडकीस आली. आधी कोरोनामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि त्यानंतर अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम हातचा गेल्याने गणेश विवंचनेत होता. सततच्या नापिकीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या गणेशला पेरणीचा खर्चही निघण्याची आशा नव्हती, यामुळे चिंतेत त्याने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गणेशच्या पश्चात पत्नी, आई, दोन बहिणी असा परिवार आहे.