जालना- शहरातील सर्वत्र फेरीवाल्यांनी बस्तान मांडलेले आहे. मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे वाहन चालकांनी वाहने लावायची कोठे? हा प्रश्न सध्या नागरीकांना भेडसावत आहे. शहरातील गांधीचमन, लोखंडी पूल, गरीब शहा बाजार, सावरकर चौक, सुभाष रोड, शिवाजी पुतळा, या वर्दळीच्या ठिकाणी फेरीवाल्यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूने जागा व्यापलेली असून, वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. पण पोलीस मात्र शाश्वत उपाययोजना करण्याऐवजी फक्त दंड वसूली करीत आहेत. विशेष म्हणजे दंड वसुलीच्या या कारावाईला दुचाकीस्वारच बळी पडत आहेत.
बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अंबड चौफुली येथे एका दुचाकीस्वाराने ट्रक चालकाला मारहाण केल्याची घटना घडली होती. भर चौकामध्ये सुरू झालेल्या या प्रकारणामुळे चारही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. औरंगाबाद वरून परभणी आणि बीडकडे जाण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे. तसेच याच परिसरात न्यायालय, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, अशी महत्त्वाची कार्यालये असल्यामुळे नेहमीच वर्दळ असते. मात्र वाहतूक शाखेचे येथे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे त्या ट्रक चालकाला नाहक दुचाकीस्वारांच्या रोषाला बळी पडावे लागले. या मारहाणीत ट्रकचालक जखमी झाला असून ट्रकचे देखील नुकसान झाले आहे. यानंतर देखील शहर वाहतूक शाखा वाहनचालकांना शिस्त लावण्यापेक्षा त्यांच्याकडून दंड आकारण्यावरच धन्यता मानत आहे.