जालना- दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण, त्यापासून शरीरासोबत पर्यावरणाचे नुकसान होत आहे. याविषयी जनजागृती करण्यासाठी मुंबई येथील ८ जणांची चमू जनजागृती करीत आहे. मुंबई ते कोलकत्ता हा सायकलवरून प्रवास करत पर्यावरण जपण्यासाठी सायकल कशी उपयुक्त आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा- अजित पवारांनी सिल्व्हर ओकमध्ये शरद पवारांची घेतली भेट ; चर्चा गुलदस्त्यात
हा संदेश देण्यासाठी विविध क्षेत्रातील 8 व्यक्ती एकत्र आले आहेत. यामध्ये ते पंचवीस वर्षाच्या तरुणांपासून ते 65 वर्षाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांपर्यंत सर्व जाती-धर्माच्या व्यक्तींचा समावेश आहे. विविध क्षेत्रातील एकत्र आलेले हे दिग्गज 23 नोव्हेंबरला मुंबई येथून निघाले आहेत. सायकलवर दैनंदिन अत्यावश्यक वस्तूंचा बोजा घेऊन दर कोस दर मुक्काम करत 8 डिसेंबरला कोलकत्ता येथे पोहोचणार आहेत. चौथ्या दिवशी जालन्यात त्यांनी प्रदूषण मुक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी सायकल ही अत्यंत उपयुक्त आहे. त्याचसोबत सायकल वापरल्याने शरीराचा देखील व्यायाम होतो. त्यामुळे अन्य कुठलाही व्यायाम करण्याची गरजही भासत नाही, असेही ते म्हणाले.
सुमारे २ हजार किलोमीटरचा हा प्रवास करण्यासाठी त्यांनी सायकलला देखील अत्याधुनिक केले आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करण्यासाठी समोर लाईट बसवलेले आहेत, तर पाठीमागून कुठलाही अपघात होऊ नये म्हणून मागच्या बाजूला देखील लाईट बसून घेतले आहेत. सॉफ्टवेअर अभियांत्रीकी, स्वतंत्र व्यवसायिक, यापासून भाभा अनुसंशोधन केंद्रातील सेवानिवृत्त अधिकारी असलेल्या व्यक्तींचा या आठ जणांच्या चमूमध्ये समावेश आहे. कुणाच्याही मदतीशिवाय स्वखर्चाने हे सर्वजण हा संदेश देत मुख्य रस्त्याने फिरत आहेत. माणसे जमतील अशा ठिकाणी प्रदूषण मुक्तीचा संदेश देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. यामधून निश्चितच आपल्याला अपेक्षित असलेला संदेश जनता स्वीकारेल, अशी अपेक्षाही त्यांना वाटत आहे.