जालना - जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील लोणी एक धक्कादायक अशी घटना घडली आहे. येथील सखाराम शिंदे हा युवक दारू पिण्यासाठी घरातील अन्नधान्य विकण्यासाठी घेऊन जात होता. त्यावेळी आईने आरडाओरड केल्याने रागाच्याभरात आईला काठीने मारहाण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक बाब गुरूवारी (5 ऑगस्ट) समोर आली आहे. आरोपीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून याबाबत पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरडाओरड केली म्हणून केली मारहाण -
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील लोणी येथील सखाराम शिंदे याला दारू व्यसन होते. तो घरातील अन्नधान्य विकून दारू पित असे. नेहमीच्या सवयीप्रमाणे गुरूवारी देखील तो पहाटेच घरातून अन्नधान्य घेऊन बाहेर जात होता. हे त्याच्या आईच्या लक्षात आल्याने त्यांनी त्याला आरडाओरड चालू केली. आपल्याला घरी खाण्यासाठी काहीच नाही तु घरातील अन्नधान्य विकू नको, असे त्या त्याला म्हणत होत्या. मात्र या आरडाओरडीने त्या मुलाला राग आल्याने त्याने आईला काठीने मारहाण केली.
शेजाऱ्यांनी रुग्णालयात केले दाखल -
गोंधळ ऐकू आल्याने सर्व शेजारी त्यांच्या घराकडे धावत आले आणि त्यांनी त्याच्या तावडीतून आईला सोडवले. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेला नागरिकांनी आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी जालना येथे घेऊन जात होते. यावेळी त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.
आरोपीवर गुन्हा दाखल -
याप्रकरणी वडीलांनी आष्टी पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. त्यानुसार आरोपी सखाराम शिंदे याच्याविरुद्ध भादंवि कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, पोलीस उपविभागीय अधिकारी राजू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे हे करत आहेत.
हेही वाचा - नवी मुंबईत कार चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीतील दोघांना अटक; 13 कारही जप्त