जालना- खरीप हंगाम 2018 मध्ये शेतकऱ्यांनी भरलेला पिक विमा अद्यापपर्यंत मिळालेला नाही. जोपर्यंत विमा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार करून महाराष्ट्र शेतकरी बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 22 पासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यामध्ये आठ लाख 57 हजार शेतकऱ्यांनी त्यांच्या वाट्याचे 38 कोटी रुपये आणि शासनाच्या वाट्याचे 187 कोटी, असे एकूण 225 कोटी रुपये आयसीआयसीआय लोम्बार्ड या कंपनीकडे विमा स्वरूपात भरले होते. मात्र आतापर्यंत चार लाख 46 हजार 208 शेतकऱ्यांनाच पिक विमा मिळाला. ही रक्कम सुमारे शंभर कोटी 94 लाख 57 हजार रुपये एवढी आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील चार लाख 10 हजार 792 शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत.
वंचित शेतकऱ्यांनाही कंपनीने त्वरीत पिक विमा द्यावा या मागणीसाठी जिल्ह्यातील शेतकरी विशेषता परतूर तालुक्यातील शेतकरी उपोषणाला बसले आहेत. यामध्ये संजय भागवत, बाबासाहेब खंदारे, भाऊसाहेब जगताप, सदाशिव जगताप, भास्कर राठोड, नारायण खरात, वैजनाथ खरात, सुभाष कुलकर्णी, शिवाजी सवणे आदी शेतकऱ्यांचा सहभाग आहे.