जालना- भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण क्षेत्रात झालेल्या पावसाने धरण शंभर टक्के भरले असून १५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तर पाटबांधारे विभागामार्फत पारधसह धरणाखालील चार गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
भोकरदन तालुक्यातील शेलूद येथील धामणा धरण परिसरातील वडोद तांगडा, धावडा, शिवना भागात सोमवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धामणा धरण शंभर टक्के भरले आणि सांडव्यावरुन पाणी पडण्यास सुरुवात झाल्याने रायघोळ नदीला पूर आला. धरणाखालील पारधसह पारध खुर्द, लेहा, शेलूद या गावांना पाटबंधारे विभागामार्फत सावधानतेचा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धामणा धरण शंभर टक्के भरल्याने धरण परिसरात शेलूद, वडोद, तांगडा,धावडा, पोखरी, भोरखेडा, जळकी, हिसोडा बु., हिसोडा खु्द, दहीगाव, जळगाव सपकाळ, आन्वा, कोठा कोळी, लेहा, पिंपळगाव रेणुकाई आदी गावासह १५ गावाचा पाणीप्रश्न मिटल्याने समाधान व्यक्त होत आहे.