जालना - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याबाबत आपणास अधिकृत माहिती नाही. अधिकृत माहिती आल्यानंतर प्रतिक्रिया देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. याआधी त्यांनी परभणीतही खडसेंच्या मोदींबाबतच्या ट्विटवर प्रतिक्रिया देण्याचे टाळत मौन बाळगणे पसंत केले होते.
अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे एक ट्विट त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून केले होते. जयंत पाटील यांचे तेच ट्विट भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी रिट्विट केले. त्यानंतर, अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र, आता या सर्वांना पूर्णविराम लागला आहे. एकनाथ खडसे यांनी आपल्या भाजपा सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाकडे दिल्याची माहिती समोर येत आहे. आता ते येत्या शुक्रवारी (23 ऑक्टोबर) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषेदत दिली.
मुंबईत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा होणार असल्याचे बोलले जात आहे. ईटीव्ही भारतशी बोलताना एकनाथ खडसे यांनी आजच पक्षाचा राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे खडसेंच्या राष्ट्रावादी प्रवेशावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ईटीव्ही भारतने खडसे राजीनामा देणार असल्याचे सांगितले होते.
हेही वाचा - मुख्यमंत्री ठाकरेंना 'त्या' शिवारातच फडणवीसांनी करून दिली मदतीच्या घोषणेची आठवण