जालना - मागील पंधरा दिवसांपासून मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांना किरकोळ मदत न करता सरसकट आणि 100 टक्के नुकसान झाल्याचे ग्राह्य धरून सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करता जिल्ह्यात आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंठा तालुक्यातील कर्नाळा, जालना तालुक्यातील सिंधी काळेगाव आणि बदनापूर शिवारातील पिक नुकसानीची पाहणी केली. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, की सरासरीपेक्षा जास्त म्हणजे जवळपास तीनशे ते चारशे टक्के पाऊस जास्त झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. यामध्ये कापूस, तूर, सोयाबीन, हळद आणि बागायती पिकाचेही नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर शेतीमधील माती वाहून गेली आहे. सध्यादेखील शेतात पाणी आहे. मात्र, सरकारी यंत्रणा अजूनपर्यंत त्यांच्या बांधावर पोहोचली नाही. या संदर्भात सरकार काहीच बोलत नाही. सरकारने त्वरित पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना मदत घोषित करावी, अशी भारतीय जनता पक्षाची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, केंद्रीय राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर , आमदार नारायण कुचे व आमदार संतोष दानवे आदी नेते उपस्थित होते.