जालना - पोलीस उपअधीक्षक सुधीर खिरडकर आणि 2 पोलीस कर्मचाऱ्यांना 2 लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. त्यांना उद्या (22 मे) न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. कालपासून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, असे सांगण्यात आले आहे. तर आज (21 मे) दुपारी 12 वाजता त्यांना अटक केल्याचे समोर आले आहे.
दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी लाच
जालना तालुक्यातील कडवंची येथील सुरेश दगडुबा क्षिरसागर यांनी जालना तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात पोलीस उपअधीक्षक सुधीर अशोक खिरडकर, पोलीस नाईक संतोष अंभोरे आणि पोलीस शिपाई विठ्ठल खारडे यांची नावे आहेत. 'आरोपींनी क्षिरसागर यांच्यावर दाखल असलेला अट्रॉसिटी गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी 5 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती 3 लाख रुपये देण्याचे ठरले', असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, त्यापैकी 2 लाख रुपयांची लाच स्वीकारताना संतोष अंभोरेंना रंगेहात पकडले. त्यांनी दिलेल्या जबाबावरून अन्य दोघेदेखील यामध्ये सामील असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावरही तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
आज गुन्हा दाखल
तक्रारदार सुरेश क्षिरसागर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आज (21 मे) तालुका पोलीस ठाण्यात दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 वाजून 6 मिनिटांनी तिन्ही आरोपींना अटक दाखविण्यात आली आहे. या तिघांनाही उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, आज दिवसभर प्रत्येक पोलीस कर्मचारी याच प्रकरणाची चर्चा करताना दिसून येत होते.
हेही वाचा - जालन्यात तालुका पोलीस स्टेशनचे सीसीटीएनएस 2 दिवसांपासून बंद