जालना: गुन्हेगार कितीही चतुर असला तरी पोलीस त्याला कधीतरी पकडतातच. याचा प्रत्यय अंबड शहरात आला आहे. एक अट्टल चोर त्याच्या डोक्यावर एकही केस नसताना चक्क केसांचा विग लावून चोऱ्या करायचा. चोरीचे प्रत्येक काम फत्ते करूनच येणाऱ्या या भामट्याच्या मुसक्या आवळण्यात जालन्यातील अंबड पोलिसांना यश आले आहे.
पोलिसांनी सापळा रचला अन् चोर पळाला: हा चोरटा कधी केसांचा विग लावून तर कधी विग न लावता चोऱ्या करायचा. तो सीसीटीव्हीमध्ये दिसला तरी त्याला ओळखणे पोलिसांसाठी अवघड झाले होते. या चोरट्याने मागील दोन महिन्यांपासून अंबड शहरात अनेक चोऱ्या करत उच्छाद मांडला होता. अखेर त्याला पकडण्यात अंबड पोलिसांना यश आले आहे. हा चोरटा अंबड येथील पाचोड रोडवरील एका पेट्रोल पंपावर विना क्रमांकाची मोटार सायकल घेऊन विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याआधारे पोलिसांनी सापळा रचून त्याची विचारपूस केली. दरम्यान त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र त्याने दुचाकीवरून पळ काढला; मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.
चोराने दिली कबुली: या चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने अंबड शहरात बागडे ज्वेलर्स, आशीर्वाद मेडिकल, साई मेन्स कापड, पैठण येथून मोटारसायकल, एक स्कुटी आणि पाचोड येथून हार्डवेअर आणि ऑटो पार्टच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. हे ऐकून पोलिसही चक्रावून गेले. आता त्याने आणखी कुठे चोऱ्या केल्या आहे का, याची चौकशी पोलीस करत आहेत.
व्यापाऱ्यांनी मानले पोलिसांचे आभार: पोलिसांनी चंदनझिरा भागातील आरोपीच्या घरातून चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला आहे. अंबड शहर आणि परिसरात पोलिसांचे व्यापारी वर्गाने आभार मानले आहेत. शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढतच असून सामान्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे; परंतु पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे सामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी केली जात आहे.
हेही वाचा: