जालना - दोन दिवसांपूर्वीच एका कोरोनाबाधित रुग्णाने सामान्य रुग्णालयातून पलायन केले होते. ही घटना ताजी असतानाच पुन्हा गुरुवारी एका कोरोना रुग्णाने सामान्य रुग्णालयातून पलायन केले. या रुग्णाचा मृतदेह राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या समोरून जाणाऱ्या रेल्वे पटरीच्या पुलाखाली सापडला.
परतूर तालुक्यातील शिरसगाव येथील ज्ञानेश्वर सोपानराव माठे (45) आणि त्यांच्या मुलावर सेलू येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान या दोघांनाही जालना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. मुलगा पॉझिटिव्ह असल्याने त्याच्यावर लगेच उपचार सुरू झाले, परंतु ज्ञानेश्वर माठे यांचा सिटी स्कॅनचा स्कोर 12 असल्याने त्यांच्यावर संशयित म्हणून उपचार सुरू होते. गुरूवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर माठे हे बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू असताना गायब झाले. थोड्या वेळातच कर्तव्य बजावत असलेल्या डॉक्टरांच्या लक्षात ही बाब आली. आणि त्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी कदीम जालना पोलिस ठाण्यात रुग्णाने पलायन केले असल्याचे सांगितले.
दरम्यान पोलिसांनी या रुग्णाचा शोध घेणे सुरू केले. त्यावेळी रुग्णालयापासून जवळच असलेल्या राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालयाच्या समोरील रेल्वे पटरीच्या खाली असलेल्या पुलाजवळ या संशयित रुग्णाचा मृतदेह सापडला. दरम्यान हा मृतदेह सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर कोविड चाचणी केली असता ज्ञानेश्वर माठे हे पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.