जालना - ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक भागात नागरिकांना वारंवार सूचना देऊन देखील नागरिक काही घरात बसायला तयार नाहीत. त्यामुळेच लॉकडाऊन दरम्यान विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना मंगळवारी जालना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. सकाळी दहाच्या सुमारास नागरिकांची रस्त्यावर प्रचंड गर्दी होत आहे. सोमवारी या गर्दीचे व्हिडिओ दिवसभर जालना शहरात समाज माध्यमांवर फिरत होते. याची दखल घेत सदर ठिकाणी पोलिसांनी ठिय्या मांडत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना चांगला चोप दिला.
हेही वाचा... न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
जालना शहरातील मध्यवस्तीत असलेल्या मामा चौकात पोलीस निरीक्षक संजय देशमुख हे त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत सकाळीच दहाच्या सुमारास ठाण मांडून बसले होते. पोलिसांच्या या पथकाने चौकात विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारांना चांगला चोप दिला. वारंवार सांगूनही हे दुचाकीस्वार ऐकत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांची वाहने देखील जप्त केली आहेत.
अनेक दुचाकीचालक दवाखाना, औषधे, बँकेचे काम आदी महत्त्वाची कामे आहेत, असे सांगून घराबाहेर पडत आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यांना असे काही काम असत नाही. ही बाब पोलिसांच्या लक्षात आल्यामुळे पोलिसांनी अशा नागरिकांना चांगलीच अद्दल घडवली.