जालना - जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी एकूण 32 रस्ते आहेत. या सर्व रस्त्यांवर चेक पोस्ट असून बंदोबस्तासाठी तैनात असणारे कर्मचारी डोळ्यात तेल घालून काम करत आहेत. मात्र, तरिही नजर चुकवून अनेकजण पायवाटेने किंवा रानावनातून जालन्यात पोहोचत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाने या सर्व चेक पोस्टवर गुगलच्या माध्यमातून नजर ठेवणे सुरू केले आहे. जिल्ह्यात आढळलेल्या दोन कोरोनाबाधितांचा परिसर देखील सील करण्यात आलाय. याचप्रमाणे गुजरातला गेलेल्या महिलेच्या जालन्यातील घरावर देखील गुगलच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केले जात आहे.
जिल्ह्यातील वाहतुकीसाठीचे रस्ते
- जिल्ह्यात दाखल होण्यासाठी बुलडाणा, औरंगाबाद, बीड, परभणी आणि हिंगोली या 5 मार्गांचा वापर करावा लागतो. त्यापैकी बुलडाण्यातून येण्यासाठी 12 रस्ते आहेत. या बारा रस्त्यांमध्ये कडवंची, वाघरुळ, सोनदेव, जयदेववाडी, पारध, वडीवाडी, वरुडी, सिंदी, रायपूर चौफुली, लालदेवपाटी, बेलोरा, बेलोरा (शेवली)हे 12 रस्ते आहेत.
- औरंगाबादहून जालन्यात येण्यासाठी 10 रस्ते आहेत. त्यामध्ये वरुडी, बोरखेडी, मालखेडा, अन्व, हसनाबाद फाटा, माहेर भायगाव फाटा ,जामखेड फाटा ,किनगाव चौफुली ,डोणगाव फाटा, बळेगाव या 10 रस्त्यांचा समावेश आहे.
- बीडमधून येण्यासाठी 5 रस्ते आहेत. यामध्ये गंगासावंगी, मंगरूळ बंधारा, जोगलादेवी बंधारा, शहागड, शिवणगाव बंधारा हे 5 रस्ते आहेत.
- परभणीहून येण्यासाठी 4 रस्ते आहेत. त्यामध्ये हे फलवाडी फाटा, सातोना, पाटोदा खुर्द, देवगाव फाटा, यांचा समावेश आहे.
- हिंगोली जिल्ह्यातून एकच मार्ग आहे. मंठा तालुक्यातील देवठाण रस्त्याचा यामध्ये समावेश होतो.
जालना शहरात एक आणि परतूर तालुक्यात एक असे दोन रुग्ण पॉझिटिव्ह होते. या दोघांचेही गूगल लोकेशन आपत्ती व्यवस्थापन कक्षाने कार्यालयीन कामासाठी नोंद केले आहे. कोरोनाबाधितांच्या तीन किलोमीटरच्या परिघामध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये बसून नियंत्रण करता येऊ शकते.