जालना - कोरोना महामारीचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. त्याला माती-चिखलात काम करणारे कुंभारदेखील अपवाद नाहीत. उद्या नवरात्र महोत्सव आहे आणि त्यानिमित्त विविध ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या सार्वजनिक देवींच्या मूर्तीची उंची तर कमी झालीच आहे. मागणी कमी झाल्यामुळे हे व्यावसायिक चांगलेच अडचणीत आले आहेत.
पुढील वर्षापासून 'प्लास्टर ऑफ पॅरिस' म्हणजेच 'पीओपी'वर देखील बंदी असल्यामुळे इच्छा नसली तरीही हे पीओपी संपविण्यासाठी देवीच्या मूर्ती तयार कराव्या लागल्या. मात्र, या मूर्तींना मागणी आली नाही ही तर मुद्दलातही घाटा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उद्यापासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे आणि त्यासाठी जालना शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये देवींच्या मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मूर्तींच्या उंचीवर शासनाने बंदी घालून त्या फक्त चार फुटापर्यंत तयार करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मोठ्या मूर्तीत मिळणारे उत्पन्न या लहान मूर्तीतून मिळत नाही. हे नुकसान झालेच आहे त्यासोबत सार्वजनिक नवरात्रोत्सवाची संख्यादेखील घटली आहे. त्यामुळे मूर्तींची संख्या देखील कमी झाले आहे.
हेही वाचा - 'स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी रामलीला उत्सवाला परवानगी द्यावी'
एकूणच सर्वच बाजूंनी कोरोनाची मार असल्यामुळे हा व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत दहा टक्केच व्यवसाय होण्याची शक्यता मूर्तिकारांनी वर्तविली आहे. तयार मूर्ती विकल्या गेल्या नाहीत तर बनवण्यासाठी केलेला खर्च देखील निघणार नाही, असे ही मूर्तिकारांनी सांगितले. सध्या बाजारामध्ये तुळजाभवानी, सप्तशृंगी देवी, अष्टभुजा देवी, रेणुका माता अशा विविध प्रकारांच्या देवींच्या मूर्ती एक फुटापासून चार फुटापर्यंत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.