जालना - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भोकरदन तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. लॉक डाऊनमुळे बाहेरचे व्यापारी फिरकत नाहीत. यामुळे द्राक्ष पिकाची नासाडी होत आहे.
अण्णा साबळे (रा. बरंजळा) यांनी २ एकर शेतामध्ये द्राक्ष बागेची कर्ज काढून लागवड केली होती. त्यांचा माल बाहेर राज्यात सुद्धा विक्री केला जातो. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लॉक डाऊन करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे बागेतील द्राक्षे पिकली असून खाली जमिनीवर गळून नासाडी होत आहे. यामुळे शेतकरी अण्णा साबळे यांच्यासह तालुक्यातील द्राक्ष उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांवर आस्मानी संकटाचा मार होत असून आता कोरोना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीठ या संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून शासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.