जालना- काँग्रेसने ७० वर्षे जातीपातीचे राजकारण केले. मात्र आम्ही विकासाचे राजकारण करतो आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहे. बदनापूर-अंबड विधानसभा मतदारसंघ निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार नारायण कुचे यांच्या प्रचारार्थ सोमवारी बदनापूर येथे जाहीर सभा झाली. या सभेत केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी महायुतीचे उमेदवार आमदार नारायण कुचे यांच्या प्रचारात आजपासून सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे महायुतीचे पारडे जड ठरणार आहे. माजी आमदार संतोष सांबरे हे महायुतीचे उमेदवार आमदार कुचे यांच्या प्रचारापासून अलीप्त असल्याच्या अफवा विरोधक उडवत होते. असे असताना आज केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सभेत सांबरे यांनी सहभागी होत महायुतीच्या प्रचारात सहभागी असल्याचे सांगितल्यामुळे शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री दानवे म्हणाले की, काँग्रेसने ७० वर्षे गरिबी हटावो, असा नारा दिला. मात्र गरिबी दूर केली नाही. देशातील गरीब जनतेने चहा विकणाऱ्या गरिबाला पंतप्रधान केले आहे. आता गरिबी हटत आहे. केंद्रातील मोदी सरकारने गरीब-श्रीमंतांमधील दरी दूर करण्याचे काम केले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून देशातील गरिबांना २०२५ पर्यंत पक्के घर बांधून देण्यात येणार आहेत.
हेही वाचा- मतदान प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्यांवर होणार पोलीस कारवाई
शासनाने देशातील ८ कोटी कुटुंबांना शंभर रुपयात गॅसची जोडणी दिली. शौचालयासाठी अनुदान दिले. माफक दरात वीज दिली. २ रुपये किलो गहू दिले तर ३ रुपये किलो तांदूळ दिला. म्हणजे गरिबी दूर करण्यासाठी देशातील व राज्यातील भाजप महायुतीच्या सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले. विकास साधायचा असेल तर रडून चालणार नाही. आमदार कुचे हा लढवय्या कार्यकर्ता असल्यामुळे त्यांना पुन्हा संधी द्या, असे आवाहनही त्यांनी सभेच्या शेवटी केले. यावेळी आमदार कुचे यांनी, मी आमदार नव्हे तर सालदार म्हणून आपली सेवा केली. यापुढेही मला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा- 'नेते, मतदार अन् माध्यमांनी सभेत अनावधानाने बोललेले वाक्य अथवा कृतीला महत्व देऊ नये'