जालना - ओबीसी समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र या मोर्चाला परवानगीबाबत प्रशासनाकडून दिशाभूल करण्यात येत आहे. आजचा मोर्चा पूर्व नियोजित असला तरीही प्रशासनाकडून अद्याप परवानागी दिल्याचे अथवा नाकारल्याचे अद्याप स्पष्ट करण्यात आले नसल्याने आंदोलकामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
दोन महिन्यांपासून तयारी
गेल्या दोन महिन्यांपासून ओबीसी मोर्चाची तयारी चालू आहे. या मोर्चाला डझनभर मंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र मोर्चाला परवानगी आहे किंवा नाही? या प्रश्नासंदर्भात अद्यापपर्यंत अधिकृत कोणीही बोलायला तयार नाही. ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी म्हणतात परवानगी आहे. परंतु कागद दाखवायला तयार नाहीत, आज सकाळी दहा वाजेपर्यंत या मोर्चाला परवानगी देण्यात आली नव्हती. तसेच जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनीदेखील दोन दिवसापूर्वीच पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्याविषयी निर्णय घेतला जाईल,असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र आज मोर्चाचा दिवस उजडला तरी परवानगीबाबत अद्याप स्पष्टता नाही.
मोर्चा निघण्याच्या तयारीत
ओबीसीचा नियोजित मोर्चा आज अकरा वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ होणार आहे. मात्र अजूनही कोणतीही लेखी परवानगी या मोर्चाच्या समन्वयकाकडे नाही.
आजच्या ओबीसीच्या मोर्चासंदर्भात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मोर्चाला परवानगी देण्यात आली असल्याचे सांगितले आहे. परंतु प्रसारमाध्यमातील बातम्यांमध्ये परवानगी नाकारल्याच्या बातम्या आल्या आहेत. याबद्दल विचारले असता, सध्या पोलीस बंदोबस्त महत्त्वाचा आहे. बातमी कोणती आहे ते महत्त्वाचे नसल्याचेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान गुप्तचर पोलीस यंत्रणेकडे अद्यापपर्यंत कोणतीही लेखी परवानगी आलेली नाही. मात्र, मंत्री वडेट्टीवार यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर कदाचित मागील ताखेचा परवानगी आदेश निघण्याची शक्यताही या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.