जालना - बैलपोळा हा अमावस्येच्या दिवशी येत असलेला सण. शेतकऱ्यांसाठी या सणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. बैलांना सजवून गावात सर्व देवतांच्या मंदिरासमोर मिरवत आणायचे आणि प्रत्येक मंदिरासमोर एक नारळ फोडण्याची प्रथा आहे. आजच्या सणादिवशी बळीराजाला कितीही काटकसर केली तरी 5 ते 10 नारळ लागतात. मात्र, सध्या नारळांची आवक कमी झाल्यामुळे भाव वाढले आहेत आणि याचा फटकाही शेतकऱ्यांना बसत आहे.
जालना शहरात आंध्रप्रदेशातील पालकोल येथून नारळ येतात. तिकडेही जोराचा पाऊस सुरू आहे आणि सध्या वाहतूक व्यवस्था तुरळक आहे. त्यामुळे नारळाची आवकही कमी असल्याने पर्यायाने भाव वाढले आहेत. एका पोत्यामध्ये 60 नग याप्रमाणे साडेनऊशे ते हजार रुपयांना एक पोते विकत घ्यावे लागते. म्हणजेच सोळा रुपयांच्या ठोक भावात हे नारळ त्यांना मिळतात. त्यानंतर वाहतूक खर्च, गुंतवणूक असा खर्च लावत एक नारळ किरकोळ ग्राहकाला बावीस रुपयांना विकत घ्यावा लागत आहे.
हेही वाचा - बदनापूर तालुक्यातील धरण जोड प्रस्ताव धूळखात
सामान्य शेतकऱ्याला आज सरासरी दहा ते पंधरा नारळे लागतात. त्यामुळे एकाच वेळी एवढे नारळ खरेदी करताना त्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आजच्या दिवशी एवढे नारळ का लागतात? या प्रश्नाला उत्तर देताना जालना तालुक्यातील राममूर्ती येथील शेतकरी गणेश गिराम म्हणाले, अमावस्या असल्यामुळे शेतातील, गावातील सर्व देवदेवतांना नारळ फोडण्याची प्रथा आहे. मात्र, सध्या कोरोनाची गंभीर परिस्थिती असल्यामुळे नारळ खरेदीत काटकसर करावी लागत आहे.
नारळ विक्रेत्यांनी देखील नारळाचे भाव वाढवले असल्यामुळे शेतकरी खरेदीत काटकसर करीत असल्याचे सांगितले. दरम्यान, पोळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी नारळ विक्रेते बसलेले आहेत. ठोक भावामध्ये खरेदी करून किरकोळ गावांमध्ये विक्री केल्यानंतर एका नारळाच्या मागे चार ते सहा रुपये मिळतात. त्यामुळे आजच्या दिवशी नारळ विकून झटपट नफा कमविण्याच्या ही पद्धत आहे. मात्र, या नारळाकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे विक्रेते देखील अडचणीत आले आहेत.
हेही वाचा - अप्पर दुधना मध्यम प्रकल्पात पाच वर्षानंतर मोठा जलसाठा: आमदार कुचे यांनी केले जलपूजन!
बैलपोळ्याच्या दिवशी बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी अशा मिरवणुकांवर बंदी घातली आहे. शेतकरी बांधवांनी घरच्या घरी पोळा साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.