जालना - अस्वच्छता व प्रदूषण अशा समस्या लोकसहभागा शिवाय सोडवणे अशक्य असून, सामान्यांमध्ये याची जनजागृती करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी व्यक्त केले. 'समस्त महाजन ट्रस्ट'च्या पुढाकारातून शहरातील विविध सेवाभावी संस्थांच्या वतीने लोकसहभागातून कुंडलिका व सीना नद्यांच्या स्वच्छता अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी शनिवारी ते बोलत होते.
हेही वाचा - अन्नातून 9 जणांना विषबाधा ! उपचारासाठी भाभा रुग्णालयात केले दाखल
नद्यांचे अस्तित्व अतिशय महत्त्वाचे आहे. त्या आपले वैभव आणि भविष्य आहेत. नद्या नष्ट झाल्या तर गावे नदीकाठची गावे जगू शकणार नाहीत हे आपण लक्षात घेतले पाहिजे असेही बिनवडे म्हणाले. कुंडलिका नदीवरील रामतीर्थ बंधाऱ्याच्या जवळ अंत्यविधी, क्रियाकर्म करण्यासाठी मोठा घाट बांधण्यात येणार आहे. या कामासाठी 75 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले. कुंडलिका व सीना नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात जंगल निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने योजनेला मंजुरी दिली आहे. या जंगलामुळे नद्या व शहरातील सौंदर्य आणि पर्यावरण शुध्द राहील, असे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.
समस्त महाजन ट्रस्टकडून महिनाभरासाठी जेसीबी यंत्र व डिझेल या उपक्रमास उपलब्ध करुन देण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील 300 गावामध्ये गत चार वर्षात समस्त महाजन ट्रस्टकडून जलसंधारणाची कामे पूर्ण झाली आहे, अशी माहिती विश्वस्त नूतन देसाई यांनी यावेळी दिली. कुंडलिका व सीना नदी जालनेकरांसाठी गंगा असल्याने तिला पवित्र व स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी असल्याचे मत उद्योजक शिवरतन मुंदडा यांनी यावेळी व्यक्त केले. समस्त महाजन, मुंबई, आनंद नगरी सेवाभावी संस्था, 100 रु. सोशल क्लब, घानेवाडी जलसंरक्षण मंच, रोटरी क्लब रेनबो, इंडियन मेडिकल असोशिएशन, रोटरी क्लब मिडटाऊन, इनरव्हिल क्लब ऑफ जालना आणि इतर संस्था या कामासाठी एकत्र आल्या आहेत.
हेही वाचा - 'राज्याच्या कामकाजात केंद्राचा हस्तक्षेप होत असेल, तर आमचं सरकार गप्प बसणार नाही'