जालना - नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती रमेश गोरक्षक यांच्या वॉर्डातच नागरिकांनी आज पाण्यासाठी रास्ता रोको केला. गेल्या महिनाभरापासून या नागरिकांना पाणीच मिळाले नसल्याने नागरिकांनी आंदोलनाचे हे शेवटचे हत्यार उपसले. दरम्यान मुख्य रस्त्यावर केलेल्या रास्ता रोकोमुळे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती.
जालना शहरातील मध्यवस्तीत असलेला प्रभाग क्रमांक 14 मधील पाणी वेस, राजमल टॉकी कुंभार गल्ली ,गुरव गल्ली, या भागातील नागरिकांना गेल्या महिनाभरापासून नळांना पाणीच आले नाही. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास कादराबाद मधील वेसेमध्ये रास्ता रोको केला. अचानक केलेल्या रास्ता रोकोमुळे शहरातील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे हा प्रभाग जालना नगरपालिकेचे पाणीपुरवठा सभापती रमेश गौरक्षक यांचा आहे.
पाणीपुरवठा सभापती च्या वॉर्डातच जनतेचे पाण्यासाठी असे हाल होत असल्यामुळे प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान सभापती गोरक्षक यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्वरित पाणी सोडण्याची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी तूर्तास हे आंदोलन मागे घेतले आहे. मात्र आज दिवसभरात जर पाणी नाही आले तर संध्याकाळी पुन्हा रास्ता रोको करण्याचा इशाराही या नागरिकांनी दिला आहे.