जालना - भारतासह जगभरात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यावर्षीही बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी करण्याचे नियोजन सुरू होते. मात्र, कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याने यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कोणतेही कार्यक्रम न घेता घरातच उत्साहात जयंती साजरी करण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त नेत्यांनीही घरातच जयंती साजरी करण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. जयंतीच्या पार्श्वभूमीवर भोकरदन शहरात सकाळी रमाईनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तसेच काही मोजक्या तसेच सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करत नगरसेविका निर्मलताई भिसे यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रा. टी. आर. कांबळे, भीमराव भिसे, माजी नगरसेवक चंद्रकांत पगारे, बाबुराव पगारे, दिलीप दोडवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर, सम्राट अशोक जयंती उत्सव समितीच्या वतीने अशोक बुद्धविहारात ध्वजारोहण तसेच बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष प्रदीप जोगदंडे, सचिव तथा नगरसेवक दीपक बोर्डे, माजी नगरसेवक चंद्रकांत पगारे, रमेशभाई पगारे, विशाल मिसाळ, रवी पगारे, प्रदीप बोर्डे, सोमनाथ बिरारे, गौतम पगारे, मुकेश बिरारे, किरण वाघमारे आदी उपस्थित होते.
हेही वाचा- बँकेतील गर्दी टाळण्यासाठी 'बदनापूर पॅटर्न', बँक प्रतिनिधींद्वारे महिला व वृद्धांना घरपोच सेवा